येस बँकेचा कारभार लवकरच नवीन संचालक मंडळाकडे

येस बँकेचा कारभार लवकरच नवीन संचालक मंडळाकडे

बँकेच्या पुनर्बाधणीनंतर आर्थिक वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला होता.

नवी दिल्ली:सलग दोन वर्षे मोठा तोटा सहन केलेल्या आणि सरलेल्या आर्थिक वर्षांत (२०२१-२२) पहिल्यांदा नफ्यात आलेल्या खासगी क्षेत्रातील येस बँकेने पुनर्बाधणी योजनेतून बाहेर पडत नवीन संचालक मंडळाच्या स्थापनेच्या दिशेने बुधवारी पाऊल टाकले.

रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्च २०२० रोजी आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेवर निर्बंध आणून, ठेवीदारांवर खात्यातून कमाल ५०,००० रुपयेच काढण्याची मर्यादा घातली होती. कंपनी सुशासन आणि कर्ज वितरणातील अनियमिततेमुळे येस बँकेसंबंधाने १३ मार्च २०२० रोजी ‘येस बँक पुनर्बाधणी योजना २०२०’ची घोषणा करण्यात आली होती. केंद्राकडून मंजूर येस बँकेच्या पुनर्रचना आराखडय़ानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला ४९ टक्के भागभांडवली मालकी देण्यात आली होती. त्यांनतर बँकेवर प्रशासक म्हणून स्टेट बँकेचे प्रशांत कुमार यांची निवड करण्यात आली होती.

येस बँकेची सर्वात मोठी भागधारक स्टेट बँकेने तीन वर्षांच्या कालावधीसाठी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी प्रशांत कुमार यांची उमेदवारी प्रस्तावित केली आहे. स्टेट बँकेने पुनर्रचित संचालक मंडळाच्या स्थापनेच्या दिशेने प्रक्रिया सुरू केली असून आगामी महिन्यात १५ जुलैला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांपुढे नवीन मंडळाचा ठराव मांडला जाईल.

बँकेच्या पुनर्बाधणीनंतर आर्थिक वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये बँकेने १,०६६ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status