नेशन्स लीग फुटबॉल : इंग्लंड-इटली सामन्यात गोलशून्य बरोबरी

नेशन्स लीग फुटबॉल : इंग्लंड-इटली सामन्यात गोलशून्य बरोबरी
लंडन : इंग्लंड आणि इटली या युरोपीय फुटबॉलमधील बलाढय़ संघांमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेली नेशन्स लीग फुटबॉलची लढत गोलशून्य बरोबरीत संपली. गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखालील इंग्लंडला या स्पर्धेतील तीनपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे लीग-अ, गट-३ च्या गुणतालिकेत इंग्लंडचा संघ केवळ दोन गुणांनिशी तळाला आहे.
गेल्या वर्षीच्या युरोपीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि इटली हे संघ आमनेसामने आले होते. लंडन येथील वेम्बली स्टेडियमवर झालेल्या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या चाहत्यांनी धुडगूस घातला होता. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री झालेल्या सामन्याकरता काही हजार शालेय मुलांनाच वोल्व्हरहॅम्प्टन स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला.
या सामन्यात दोन्ही संघांकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, दोन्ही संघांच्या आक्रमणात धार दिसली नाही. तसेच दोन्ही संघांनी भक्कम बचावही केल्यामुळे हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
या बरोबरीनंतर इंग्लंडच्या खात्यावर दोन गुण आहेत. तर इटलीचा संघ पाच गुणांसह गटात अग्रस्थानी आहे.
अन्य निकाल
’ नेदरलँड्स २-२ पोलंड
’ हंगेरी १-१ जर्मनी
’ वेल्स १-१ बेल्जियम
’ लक्झ्मबर्ग ०-२ टर्की
’ रोमेनिया १-० फिनलंड