रुपयाचा ऐतिहासिक तळ ; चार सत्रातील घसरणीतून सावरत ‘सेन्सेक्स’ची ४२५ अंश उसळी

रुपयाचा ऐतिहासिक तळ ; चार सत्रातील घसरणीतून सावरत ‘सेन्सेक्स’ची ४२५ अंश उसळी

युक्रेन युद्ध सुरूच असल्याने त्याच्यासह उच्च चलनवाढीने एकूण जागतिक अर्थव्यवस्थेपुढे मंदीचे आव्हान उभे केले आहे.

मुंबई : जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय गुंतवणुकीचे निर्गमन या परिणामी गुरुवारच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी ८ पैशांनी घसरत ७७.७६ रुपये पातळीवर गडगडून स्थिरावला. त्यानंतर ७७.८१ हा ऐतिहासिक नीचांकी तळही त्याने दाखविला. बुधवारच्या सत्रात रुपया ७७.६८ पातळीवर स्थिरावला होता. मात्र गुरुवारी सेन्सेक्स चार सत्रातील घसरणीतून सावरताना दिसला.

आंतरबँक परकीय चलन बाजारात गुरुवारच्या सत्रात रुपयाने ७७.७४ या नीचांकापासूनच व्यवहारास सुरुवात केली. परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा सुरूच असल्याने आशियातील प्रमुख भांडवली बाजारात निर्देशांकांची घसरण कायम आहे. त्या परिणामी सर्वच आशियाई चलने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत कमजोर झाली आहेत. बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्यात आली. सलग दोन महिन्यांच्या काळात रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात ०.९० टक्क्यांची वाढ केली. बरोबरीने चलनातील घसरणीला रोखण्यासाठीही मध्यवर्ती बँकेचा सक्रियपणे हस्तक्षेप वाढेल, हाच सध्यातरी रुपयासाठी आशेचा एकमेव किरण आहे, अशी प्रतिक्रिया सीआर फॉरेक्स अ‍ॅडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित पाबारी यांनी व्यक्त केली.

युक्रेन युद्ध सुरूच असल्याने त्याच्यासह उच्च चलनवाढीने एकूण जागतिक अर्थव्यवस्थेपुढे मंदीचे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सुरक्षित आश्रय आणि चिरंतन पर्याय म्हणून डॉलर मालमत्तांकडे जागतिक गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. अन्य सर्व जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलरची मजबुती ही रुपयाच्या मूल्यालाही मारक ठरली आहे.

‘सेन्सेक्स’ची झेप

मुंबई : जागतिक पातळीवरील प्रतिकूल संकेताकडे दुर्लक्ष करत, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि टेक मिहद्र या आघाडीच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने गुरुवारी भांडवली बाजारात ‘सेन्सेक्स’ला ४२७ अंशांच्या उसळीचे बळ मिळवून दिले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४२७.७९ अंशांनी वधारून ५५,३२०.२८ पातळीवर बंद झाला. गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सने ५५,३६६.८४ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला, तर सत्रादरम्यान त्याचा नीचांक ५४,५०७.४१ अंश असा होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२१.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १६,४७८.१० पातळीवर स्थिरावला.

पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि वाढती महागाई यामुळे अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेतही एकीकडे करसंकलन वाढत असले तरी, सरकारचा अनुदानावरील खर्च वाढल्याने भांडवली खर्चात कपात होण्याची शक्यता आहे. तथापि या अनिश्चिततांकडे दुर्लक्ष करीत गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह कायम आहे. तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अव्याहतपणे समभाग विक्रीचा मारा कायम आहे, असे निरीक्षण एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधनप्रमुख एस रंगनाथन म्हणाले.

सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टेक मिहद्र, सन फार्मा आणि कोटक मिहद्र बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे टाटा स्टील, एनटीपीसी, स्टेट बँक आणि बजाज फायनान्सच्या समभागात प्रत्येकी ३.८१ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status