एलआयसीकडून नवीन ‘बीमा रत्न’ योजना

एलआयसीकडून नवीन ‘बीमा रत्न’ योजना
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने सरलेल्या शुक्रवारपासून लागू झालेली नवीन योजना ‘बीमा रत्न’ या नावाने प्रस्तुत केली आहे. या बाजारसंलग्न नसलेल्या वैयक्तिक विमा योजनेतून बचत आणि जीवन सुरक्षा असा दुहेरी लाभ मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. हप्ते भरण्याचा मर्यादित कालावधी आणि नियतकालिक निश्चित ‘मनी बॅक’ हमी अशी ‘बीमा रत्न’ (कोष्टक क्रमांक ८६४) ची वैशिष्टय़ आहेत. या योजनेत १५, २० आणि २५ असे मुदत कालावधीचे पर्याय उपलब्ध असून, मुदतकाळाच्या तुलनेत चार वर्षे कमी हप्ते भरण्याचा कालावधी असेल. किमान विमित रक्कम (सम अश्युअर्ड) पाच लाख रुपये आणि त्यानंतर २५ हजार रुपयांच्या पटीत कमाल कितीही रकमेचा विमा योजनेद्वारे उतरविला जाऊ शकतो. मुदतकाळानुरूप योजनेसाठी पात्र किमान वय हे ९० दिवस ते पाच वर्षे या दरम्यान निर्धारित करण्यात आले आहे.