‘मला अजूनही विश्वास बसेना की माझ्या…’ इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला बसला आर्थिक फटका

‘मला अजूनही विश्वास बसेना की माझ्या…’ इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला बसला आर्थिक फटका
आपल्या धारदार गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांची दांडी गुल करण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड ओळखला जातो. त्याच्या वेगवान गोलंदाजी माऱ्यासमोर दिग्गज फलंदाजदेखील जास्त काळ तग धरू शकत नाहीत. अशा या खेळाडूची सध्या झोप उडाली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ड ब्रॉडची सह-मालकी असलेल्या पबला शनिवारी पहाटे आग लागली.
मिरर डॉट को डॉट युके या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नॉटिंगहॅमशायरमधील अप्पर ब्रॉटन, ईस्ट मिडलँड्स परिसरात असलेल्या पबचे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ‘टॅप अँड रन’ असे नाव असलेला हा पब स्टुअर्ट ब्रॉड आणि त्याचा नॉटिंगहॅमशायरमधील माजी सहकारी हॅरी गर्ने यांच्या मालकीचा आहे. आठ अग्निशामक बंबांच्या मदतीने पबला लागलेली आग आटोक्यात आणली गेली.
समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु, पबच्या छताचे आणि पहिल्या मजल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नॉटिंगहॅमशायर फायर अँड रेस्क्यू स्टेशन मॅनेजर जोनाथन विल्सन यांनी सांगितल्यानुसार, ‘पबच्या इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी आठ अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचवण्यात आले होते.’
Support & sorry for the disruption.Thinking of our awesome staff today, every single person there has created a special pub for the community. It hurts right now but we will come out the other side @gurneyhf @AvrilGurney pic.twitter.com/vEgFPby1zI— Stuart Broad (@StuartBroad8) June 11, 2022
स्टुअर्ट ब्रॉड सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना खेळण्यात व्यस्त आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याने ट्विटरवर लिहिले, “मला आज सकाळी मिळालेल्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. मला अजूनही खात्री वाटत नाही. आमच्या पब @tapandruncw ला आज पहाटे आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. नॉटिंगहॅमशायर अग्निशमन सेवेने अतुलनीय प्रयत्न केले. यावेळी गावकऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.”
ब्रॉडचा संघातील सहकारी असलेल्या जेम्स अँडरसनने सांगितले, “कोणालाही दुखापत न झाल्यामुळे ब्रॉड समाधानी आहे. मात्र, तो नाराज झाला आहे. कारण, तो पब त्याच्या आणि हॅरीच्या आयुष्याचा मोठा भाग आहे.” पबला आग लागल्याची वाईट बातमी मिळूनही ब्रॉडने ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी चांगला खेळ केला. त्याने २६ षटके फेकून १०७ धावांमध्ये दोन बळी घेतले.