अन्वयार्थ : निकालाची परीक्षा

अन्वयार्थ : निकालाची परीक्षा

यंदा विज्ञान शाखेतील गुणवंतांची संख्या ९८.३० टक्के, वाणिज्य शाखेतील गुणवंत ९१.७१ टक्के आणि कला शाखेतील ही टक्केवारी ९०.५१ टक्के आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा यंदाचा निकाल मागील वर्षीच्या निकालापेक्षा फक्त ५.७४ टक्के कमी लागला, यात फार विशेष काही घडलेले नाही. २०२१ मध्ये बारावीची परीक्षाच झाली नाही. वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना गुणवाटप करण्यात आले. त्याचा निकाल ९९.९६ टक्के लागला होता. यंदा ती प्रत्यक्ष झाली आणि निकालात घट होऊन उत्तीर्णाचे प्रमाण ९४.२२ टक्के झाले. पुढील वर्षी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या गुणांबरोबरच बारावीच्या परीक्षेतील गुणांचाही विचार करण्याचे सूतोवाच उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्त्वाचा ठरतो. या वर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार एवढी आहे. ती मागील वर्षी ९१ हजार ४२० एवढी होती. अंतर्गत मूल्यमापन आणि प्रत्यक्ष परीक्षा यातील हा फरक लक्षात येण्याजोगा आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा खूपच वाढून दोन लाख ३० हजार एवढी झाली आहे.

केंद्रीय प्रवेश परीक्षांचा पर्याय सुरू झाल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे महत्त्व कमी होत गेले. या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत असे, तेव्हा या परीक्षांचे महत्त्व खूपच वाढले होते. आता हे महत्त्व पुन्हा मिळवण्यासाठी या परीक्षेतील गुणही ग्राह्य धरण्यात यावेत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. सीबीएसई या केंद्रीय परीक्षा मंडळाच्या परीक्षेत अधिक गुण दिले जातात, त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात नेहमीच झुकते माप मिळते, असा आरोप केला जात असे. तो केंद्रीय प्रवेश परीक्षेमुळे निकालात निघाला. सगळय़ा परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्याव्यात, असा आग्रह गेली दोन वर्षे विद्यार्थी आणि पालक करीत होते. ही मागणी किती फोल होती, हे यंदाच्या निकालावरून स्पष्ट होईल. मुळात प्रत्येक वर्षी निकालातील बहुसंख्य विद्यार्थी ३५ ते ७५ टक्के गुणांच्या टक्केवारीत असतात. या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार कोणतीही शिक्षणव्यवस्था करीत नाही.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नंतरच्या काळात नोकरी मिळण्यायोग्य अभ्यासक्रमही फारच कमी. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नेमके करायचे काय, असा प्रश्न पालकांऐवजी खरे तर शिक्षणव्यवस्थेपुढे यायला हवा. यंदा विज्ञान शाखेतील गुणवंतांची संख्या ९८.३० टक्के, वाणिज्य शाखेतील गुणवंत ९१.७१ टक्के आणि कला शाखेतील ही टक्केवारी ९०.५१ टक्के आहे. ती पाहता बारावी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदाबरोबरच त्यांच्या भवितव्याच्या चिंतेने शिक्षण क्षेत्रातील अनेकांना वेदना होणे स्वाभाविक आहे. पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेण्याची ठाम भूमिका घेऊन  १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आव्हान व्यवस्थित पेलल्याबद्दल परीक्षा मंडळाचे अभिनंदन करायला हवे. करोनाकाळाने शिक्षणाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले. यापुढील काळात शिक्षणाकडे अधिक काळजीने पाहण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे, हेच या निकालाचे सांगणे आहे. अन्यथा सगळय़ांना परीक्षा न घेताच वरच्या वर्गात ढकलण्याने फारसे काही साध्य होणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होऊ घातली असताना, आजवरच्या परीक्षा पद्धतीचा नव्याने विचार करणे आवश्यक ठरणार आहे.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status