साम्ययोग : श्रम-धर्माचा सेवक

साम्ययोग : श्रम-धर्माचा सेवक

ज्ञानोबा ते विनोबा या आठ शतकांच्या परंपरेला अध्यात्माप्रमाणेच शरीरश्रमाचाही आधार आहे.

अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

ज्ञानदेवांनी धर्मकीर्तन समाप्त करताना ‘पाईकपण’ धारण केले. विनोबांचे आयुष्य पाईकपणापासून सुरू झाले. त्यांनी युगधर्म ओळखून त्याची सेवा केली. ज्ञानोबा ते विनोबा या आठ शतकांच्या परंपरेला अध्यात्माप्रमाणेच शरीरश्रमाचाही आधार आहे. खरेतर ही परंपरा श्रमप्रधान आहे. परंपरेने सांगितलेल्या समत्वाला शरीर कष्टांचा मोठा आधार आहे.

विनोबांनी परंपरेचा सादर स्वीकार केला. तसेच त्या गुणांना युगानुकूल बनवले. त्यांच्या साम्यसूत्रांमध्ये क्रांतिकारी आशय असणारी सूत्रे आहेत शरीरश्रमाला प्राधान्य देणारे ‘प्रकृति : शोध्या’ हे ७५ वे साम्यसूत्र रोजच्या जगण्यासाठी फार मार्गदर्शक आहे. याचा अर्थ प्रकृतीचे शोधन करायचे. तिचा अभ्यास करायचा. वैद्य रोग्याची जशी तपासणी करतो तशी ही चिकित्सा हवी.

इथे ‘प्रकृती’चा शारीर अर्थही विनोबांना अभिप्रेत आहे. सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांची चिकित्सा करत प्रकृती अधिकाधिक शुद्ध राखायची आणि ‘गुणातीत’ व्हायचे.

ही साधना सांगायला आणि ऐकायला सोपी असली, तरी तिचे आचरण महाकठीण आहे. आपण शरीरश्रम ही गोष्ट विसरलो आहोत, हे याचे मुख्य कारण आहे.

यावर उपाय सांगणारे आणि त्याहीपेक्षा सावध करणारे साम्यसूत्र आहे ‘श्रम-सञ्जत वारिणा’ शरीरश्रम केल्यामुळे घाम येतो. त्या घामाने प्रकृती ठीक करावी. सुदृढ करावी असे सांगणारे हे सूत्र आहे.

सार्वत्रिक अनारोग्य नोंदवताना साम्ययोग एका सूत्रात मार्गदर्शन करतो. ‘श्रम-निष्ठा रामबाण:’ श्रमावर मनापासून निष्ठा असेल तर श्रमांमुळे प्रकृतीचे संपूर्ण शोधन होते आणि ती उत्तरोत्तर शुद्ध होते. श्रमांवरची ही निष्ठा किती सखोल असते याचे विनोबांच्या आयुष्यातील एका प्रसंगावरून प्रत्यंतर येते.

विनोबांना एक दिवस एक गृहस्थ भेटायला आले (बहुतेक तत्कालीन लोकसभा अध्यक्ष दादासाहेब मावळंणकर असावेत). विनोबा तेव्हा कचरा गोळा करत होते. इतका मोठा माणूस अशा किरकोळ कामात लक्ष घालतो आहे, हे पाहून दादासाहेबांना वाईट वाटले. हे काम दुसरे कुणीही करू शकेल आणि विनोबांनी लेखन, वाचन आदी कामे करावीत, असे त्यांना वाटले. तसे त्यांनी बोलूनही दाखवले.

विनोबांनी त्यांना ऐकवले, ‘हा कचरा घ्या. एका बाटलीत भरा. त्यावर लिहा- मूर्ख बाबा. ती बाटली दिल्लीला घेऊन जा.’

पुढे विनोबा म्हणाले, ‘मनात विकार नसताना केलेल्या कामात माझा वेळ वाया जात नाही.’ ही त्यांच्या श्रम-निष्ठेची कुळी होती. कचरा गोळा करण्यामागेही त्यांचे तत्त्वज्ञान होते.

विनोबांना ही वाट गांधीजींमुळे गवसली हे खरेच तथापि तिचा उगम संतांनी समोर ठेवलेल्या आदर्शात दिसतो. कोणत्याही संताने परम सत्य गवसण्यापूर्वी वा नंतर हातातील काम सोडल्याचे दिसत नाही. उलट आपल्या देवतेला २८ युगे वाट पाहायला लावली. देवानेही विनातक्रार ही परिस्थिती सहन केली.

संतांनी युगधर्म सांगितला आणि विनोबांनी सेवक वृत्तीने आचरणात आणला. शरीरश्रम आणि साम्ययोग या गोष्टी परस्परावलंबी आहेत. या नात्याला अन्यही पदर आहेत.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button