साम्ययोग : क्रांतदर्शनातून ग्रहणमुक्ती

साम्ययोग : क्रांतदर्शनातून ग्रहणमुक्ती
अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
‘आम्हाला सार्वभौम क्रांतीची आवश्यकता वाटते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आम्ही क्रांती करू पाहात आहोत. साम्ययोग आणण्याचे कार्य मूलभूत, समग्र सर्वागीण क्रांतीचे कार्य आहे. क्रांतीसाठी (मात्र) क्रांतदर्शनाची आवश्यकता असते.’
– विनोबा भावे, ‘साम्ययोग का दर्शन’.
ग्रहणाची खगोलशास्त्रीय कल्पना वेगळी असली तरी त्या पाठीमागे पौराणिक कथाही आहे. सामान्य जनांच्या मनात पुराणकथा अगदी खोलवर रुजलेल्या असतात. याची जाणीव असणाऱ्या विनोबांनी, सामाजिक परिवर्तनातील दोन मोठे अडथळे या पौराणिक संकल्पनांच्या आधारे सांगितले आहेत. त्यांच्या मते ही समाजरचना राहू-केतूंची आहे. म्हणजे धड आहे तर मस्तक नाही आणि मस्तक आहे तर धड नाही. समाजातील एक वर्ग अखंड राबतो आणि दुसरा अखंड बौद्धिक काम करतो. विनोबांच्या कल्पनेतील समाजरचना यापेक्षा फार निराळी आहे. केवळ राबणे आणि केवळ डोकेफोड करणे अशी रचना ते साफ नाकारतात. ‘केवळ बौद्धिक असे कामच नसते,’ इतक्या थेट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्याचप्रमाणे परिश्रमाला विचारांची जोड नसेल तर तेही व्यर्थ ठरतात. सामाजिक साम्याच्या स्थापनेत या राहू-केतूंचा असा अडथळा आहे. यावर उपाय काय? सर्वोदयी विचारसरणीत शरीर परिश्रमाला व्रताचे स्थान आहे. राष्ट्रपती ते सामान्य पट्टेवाला यांनी रोज काही तास तरी शरीर परिश्रम केलाच पाहिजे असा विनोबांचा आग्रह असे. लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण यांचा अपवाद वगळता प्रत्येक व्यक्तीने शरीरश्रमाचा मार्ग आचरणात आणलाच पाहिजे असे त्यांचे सांगणे होते. शेती, सूतकताई, परिसर स्वच्छता, मजुरी आदींपैकी कोणतेही काम निवडावे आणि जीवनमानात बदल करावा. या मांडणीत राहू-केतूंची संकल्पना फार महत्त्वाची आहे. कारण ते पूर्वीपासून कष्ट करणाऱ्या वर्गावर पुन्हा तेचे ओझे देत नाहीत. त्यांना ते श्रद्धाधिष्ठित बौद्धिकतेची कास धरायला सांगतात. कष्टांना विचारांची जोड देण्याची त्यांची कल्पना अगदी स्पष्ट आहे. कष्टकरी वर्गाने गीताई, गीता प्रवचने, धर्मश्रद्धांचा समन्वय करणारे साररूप ग्रंथ आदींचे परिशीलन करावे हे विनोबांचे सांगणे आहे. त्यांच्या समग्र साहित्याचे हे मोठे प्रयोजन आहे. ज्ञानेश्वरी कोणत्याही वेडगळ समजुतींना थारा देत नाही, तो निर्दोष धर्मग्रंथ आहे असे विनोबा म्हणत. विनोबांच्या गीतार्थाचेही आणि अन्य वाङ्मयाचे असेच वर्णन करता येते. चित्तशुद्धीसाठी विनोबा श्रद्धेचा मार्ग कसा अवलंबत याचे उदाहरण म्हणजे चंबळच्या दरोडेखोरांच्या मानसिक पुनर्वसनाचे कार्य. या गुन्हेगारी प्रवृत्तीमागील सामाजिक कारणांचा त्यांनी विचार केला आणि पुनर्वसनासोबत रामचरित मानस आणि गीता प्रवचने वाचण्याची सूचना केली. श्रद्धेला असणारे स्थानिक संदर्भ त्यांनी विचारात घेतल्याचे दिसते. दुसरीकडे बौद्धिक अहंतेचा त्यांनी वारंवार धिक्कार करत श्रद्धेचा अंगीकार करण्याचा आग्रह धरला. विनोबांना नकोसे असणारे हे ‘राहू-केतू’ नष्ट करायचे तर समग्र सामाजिक परिवर्तन अटळ ठरते. आजच्या विषम समाजरचनेतील सर्व दोष या संकल्पनेने नाहीसे करावे लागतात आणि चित्तशुद्धीला तेवढेच महत्त्व द्यावे लागते.साम्ययोगाच्या परिभाषेत सांगायचे तर, ही पर आणि अपर पातळीवरील साम्यस्थापना आहे.