लोकमानस : धर्म आणि राजकारणाची युती उघड झाली..

लोकमानस : धर्म आणि राजकारणाची युती उघड झाली..

बरं! हे कमी म्हणून की काय हनुमान जन्मस्थळावरून बोलाविलेली चर्चा भरकटून ती ‘कॉंग्रेसवाले – भाजपवाले’, या राजकीय पातळीवर पोहोचली. भारतात धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालत असतात, याची प्रचीती मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा आली.

‘स्वागतार्ह साधू!’ हे उपहासात्मक आणि प्रहसनात्मक संपादकीय (४ जून) वाचले. हनुमानाचे जन्मस्थळ महाराष्ट्रातील नाशिकजवळील अंजनेरी की कर्नाटकातील कििष्कधा यावर शास्त्रार्थ सभेत खलबते झाली आणि एकाच जीवाचा जन्म दोन ठिकाणी कसा होऊ शकतो या बुद्धिप्रामाण्यवादी तर्काला भक्तिप्रामाण्यवादाने तिलांजली देऊन हनुमानाच्या जन्मस्थळाला अंजनेरी आणि कििष्कधा या दोन्ही ठिकाणांसाठी मान्यता देण्यात आली. असेही आपल्याकडे धर्माशी जे काही निगडित आहे तेच अंतिम सत्य आणि धर्मगुरू जे सांगतील तिच पूर्व दिशा, अशी समाजधारणा असल्याने जन्मानंतर पूर्वेकडील उगवत्या सूर्याकडे झेपावणाऱ्या हनुमानासाठी अंजनेरी की कििष्कधा यापैकी कोणते ठिकाण सोयीचे होते अशा बालबुद्धीच्या उपप्रश्नांनी आमची बुद्धी चाळवली जात नाही तर धर्मनिगडित अंतिम सत्याने मती मात्र गु़ंग व्हायला होते आणि हाच तर खरा धर्माचा मुख्य हेतू असावा. म्हणूनच तर कोण्या एका द्रष्टय़ा कार्ल मार्क्‍सने, ‘धर्म म्हणजे अफूची गोळी’, असे विधान इतिहासात नोंदवून ठेवले असावे. पण, हनुमान जन्मस्थळाच्या या अहमहमिकेत कथित धर्मसभेत जमलेल्या संत-महंतांत आसनावरून मानापमान नाटय़ रंगले आणि जमलेली कथित धर्मगुरू मंडळी हमरीतुमरी – हातघाईवर आली. त्यामुळे धर्मसभेची व्हायची ती ‘शोभा’ झाली, जमलेल्या साधू – संत – महंतांची ‘प्रभा’ मात्र चव्हाटय़ावर आली.

बरं! हे कमी म्हणून की काय हनुमान जन्मस्थळावरून बोलाविलेली चर्चा भरकटून ती ‘कॉंग्रेसवाले – भाजपवाले’, या राजकीय पातळीवर पोहोचली. भारतात धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालत असतात, याची प्रचीती मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा आली. धर्म आणि राजकारण्यांची युती नेहमीच सर्वसामान्यांसाठी प्रगतीविरोधी ठरली आहे असं इतिहास सांगतो. पण, धर्ममरतडांआडून राजकारण करणाऱ्यांना शेवटी धर्ममरतडच अडचणीत आणत असतात हे वास्तवदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

मध्यंतरी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरस्थळी कालसर्पशांती विधीवरून पुरोहितांच्या दोन गटा़ंत हाणामारी झाली होती. यात बंदूक, तलवारी, कोयत्यांचा वापर झाल्याची घटना घडली होती. एका बाजूला जनमनाला मन:शांतीचा उपदेशामृत पाजत अध्यात्माची महती गायची आणि स्वत: मात्र अशांतीचा मार्ग अवलंबायचा! यावरून या तथाकथित धर्मगुरूंना आपलाच ‘डोलारा’ सांभाळता येत नाही, हेच अधोरेखित होते. मथुरा, दिल्ली येथील धर्मसभेत हिंदु धर्मरक्षणार्थ हिंदु धर्मीयांनी हत्यारे बाळगावीत, असे आवाहन (मंत्राने वैरी मरतो, तर तलवारीचा काय उपयोग, असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे!) तथाकथित धर्मगुरूंनी केले. हातात नंग्या तलवारी घेऊन दंगा – उन्माद करणे म्हणजे हिंदु धर्म नव्हे, तर तलवारी म्यान करायला भाग पाडणे ही खरी हिंदु धर्मसंहिता आहे. भारतीय साहित्यरचनेत, ‘जाति ना पुछो साधू की’, ‘साधू – संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’, अशा शब्दांत साधू – संतांची महती वर्णिली आहे. संत हे समाजाचे मार्गदर्शक असतात. पण, आजचे हे आधुनिक संत आपल्या उथळ कृतींमुळे वाचाळवीर ठरतात. या सर्व घडामोडी, दावे-प्रतिदावे, धर्मपीठांवरील वर्चस्वाच्या लढाईचे वर्णन ‘देव झाले उदंड आणि भक्तांना चढला भक्तीचा गंड, देव देव्हाऱ्यात आणि भक्त उन्मादात’, असेच करावे लागेल. एकीकडे भारतीय समाज पूर्वापार देवदेवतांच्या, अवतारांच्या अनेक मिथक कथांनी जखडून ठेवला गेला आहे आणि दुसरीकडे देवतांबरोबरच धार्मिक गुरू – बाबा – आचार्य – साधू –  संत – महंतांची संख्या व प्रस्थ झपाटय़ाने वाढून बलाढय़ आणि धनाढय़ धर्मपीठे निर्माण झाली आहेत.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे

तुका म्हणे जळो तयांची संगती.

‘स्वागतार्ह साधू’ हा विडंबनात्मक अग्रलेख (४ जून) वाचल्यावर वाटायला लागले की, करोनाकाळात हनुमानाची जात आणि धर्म शोधायला निघालेल्या हिंदुत्ववाद्यांची आता हनुमान चालीसावरून सुरू झालेली हनुमान गायनाची गाथा जन्मस्थानापर्यंत आली आहे. सध्या वीररसाचे पर्व सुरू झाले आहे. २०२४ पर्यंत चिरंजीव पवनसुत हनुमान हा महंत, साधू, संतासह श्रीराम चरणी लीन होईल.

अरे, ही धर्मसभा आहे की  ग्रामपंचायतीची ग्रामसभा? आमच्या गावात ग्रामपंचायतीतील ग्रामसभेत झालेला राडा नाशिकच्या धर्मसभेमुळे आठवला. विशेष म्हणजे धर्मसभा सुरू होण्यापूर्वी एकाही आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी वा राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हनुमान चालीसा पठण कसे केले नाही याचेच आश्चर्य वाटते.

कुठे गेले ते ‘हनुमान चालीसा’वीर? असो.

राग, लोभ, मद, मोह, माया, मत्सर यांपासून ही तथाकथित संत, महंत मंडळी आपली सुटका करून घेऊ शकली नाहीत, ती काय भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवणार, एवढे मात्र नक्की कळले.

हनुमानाचे जन्मस्थळ आम्ही म्हणू तेच आहे, हे न ऐकणाऱ्याला हनुमानाची गदा म्हणून समोरचा बूम उचलून उगारणे हे कुठल्या सुज्ञपणात बसते? खरेच हिंदु धर्म आणि धार्मिक एवढे उथळ झाले आहेत? अशा वेळेस मात्र अंधभक्तांच्या भावना अशा उठवळ कृत्यामुळे कशा दुखावत नाहीत? उन्मत्त महंत आणि उथळ अंधभक्त यांच्या स्वप्नातील हिंदु राष्ट्र असेच आहे का? पंडित, दास, मुनी, शास्त्री, महंत असे शब्द नावाच्या पुढे-मागे लावणारे हे गणंग माकडांना लाजवतील असे वर्तन करतात. हे असे दांडगट समाजापुढे काय आदर्श घालून देतात? तरीही या महाभागांना आदर्श समजणारा समाज काय लायकीचा असेल हे यावरून समजते.

 ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनि म्हणति साधु॥१॥

अंगी लावूनियां राख। डोळे झांकुनी करिती पाप॥२॥

  दावुनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा॥३॥

तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती॥४॥

– जगदीश काबरे, सांगली

यापुढे अशाच नामुष्कीचे स्वागत करू या

‘स्वागतार्ह साधू’ हा अग्रलेखाचा मथळा आणि त्यातील उपहासात्मक विवेचन वाचताना मला रंगनाथ पठारे यांच्या ‘नामुष्कीचे स्वगत’ या कादंबरीची आठवण झाली तिच्या आशयासह. त्यातही त्यांनी व्यक्ती पातळीवर कुटुंब, समाज यांजकडून सामाजिक, मानसिक, आर्थिक नामुष्की स्वीकारण्यात शहाणपण अशा उपरोधिक आशयाभोवती खिळवून ठेवणारी अतिशयोक्त मांडणी केली आहे. इथून पुढे वर्तमान प्रश्न, त्याच्याशी निगडित प्राधान्यक्रम, आधुनिक समाजाची वाटचाल इत्यादी गोष्टी गौण समजून अग्रलेखातील साधूंचे, शहरांचे नामकरण, हनुमान चालीसा, जुने इतिहासातील जगण्याशी सुतराम संबंध नसलेले विषय यालाच प्राधान्य देऊन त्यासाठी संघर्ष करणाऱ्यांचे, मग ते जे कोणी असतील, त्यांचे स्वागत करूयात.

– सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)

यांना साधू, महंत का म्हणावे?

‘स्वागतार्ह साधू’ हा उपरोधिक अग्रलेख वाचला. एके काळी कुंभमेळाव्याखेरीज सुप्त स्थितीत राहणारा साधू, महंत समाज गेल्या आठ वर्षांत फारच उसळून वर येतो आहे. त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. वेळप्रसंगी शारीरिक पातळीवर येणाऱ्यांना साधू, महंत म्हणावे का, असाही प्रश्न उपस्थित होतो

दया, प्रेम, शांती आहे; काम, क्रोध, मोह यावर विजय मिळवला आहे तोची साधू ओळखावा ही उक्ती सध्या विलोपली आहे, हेच दिसून येते. आज देशात ६० टक्के लोक जेमतेम एक वेळ जेवू शकत आहेत. अशा परिस्थितीत अशा धष्टपुष्ट साधूंना पोसणारे धनिक कोण व यांना पोसण्यात त्यांना काय स्वारस्य आहे, हा प्रश्न पडतो. 

– राम देशपांडे, नवी मुंबई

जातवर्चस्वाची भावना समूळ घालवली पाहिजे

‘अमेरिकेतही जातिभेद..’ हे लोकसत्ता (४ जून)मधील ‘विश्लेषण’ वाचून अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण याआधीही सिलिकॉन व्हॅलीमध्ये अनुसूचित जातींच्या लोकांविरुद्ध जातिभेद केला जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. आता गूगलमध्ये त्याची पुनरावृत्ती होत आहे. याचा अर्थ असा नव्हे की या घटनांच्या आधी अमेरिकेत जातिभेद केला जात नव्हता. आता पीडित लोकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली असल्याने अशा घटना उजेडात येत आहेत, एवढेच. विशेष म्हणजे अमेरिकेत गेलेले हे भारतीय लोक उच्चशिक्षित आहेत. तिथे गेलेले अनुसूचित जातीचे लोकसुद्धा उच्चशिक्षित आणि गुणवत्ताधारक आहेत.

पण या प्रसंगावरून हेच सिद्ध होते की अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांनी कितीही शिक्षण घेतले, गुणवत्ता सिद्ध केली तरी, अगदी परदेशातसुद्धा त्यांना इतर भारतीयांकडून जातिभेदाचा सामना करावा लागतो, अन्याय सहन करावा लागतो. तसेच तथाकथित उच्च जातीच्या लोकांच्या मेंदूमध्ये असलेली जात-वर्चस्वाची भावना देशात किंवा देशाबाहेरसुद्धा तशीच कायम असते. यास काही सन्माननीय अपवाद असतील.

अमेरिकेसारख्या समतेला महत्त्व देणाऱ्या देशात ही परिस्थिती असेल तर आपल्या देशात काय स्थिती असेल याची कल्पनाच अंगावर काटा आणते. अमेरिकेतील बहुसंख्य गोऱ्या लोकांमध्ये काळय़ा लोकांवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत पश्चात्तापाची भावना दिसून येते. परंतु अशा भावनेचा लवलेशही भारतीयांमध्ये नसल्याचे अशा घटनांवरून दिसून येते. भारताबाहेर अन्य देशांत आपण सारे भारतीय असतो या समजास यामुळे तडा जात आहे.

यावरून, असेही म्हणता येईल की जातिभेद घालवायचा असेल तर त्यासाठी जातिव्यवस्थेचे मुख्य लाभधारक असलेल्या उच्च जातींनी आपल्या मनातील जातीय वर्चस्वाची भावनाच समूळ घालवून टाकली पाहिजे.

– उत्तम जोगदंड, कल्याण

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status