Salman Khan in IPL : शाहरुख खानप्रमाणे सलमान खानलाही पाडायचीय आयपीएलमध्ये छाप

Salman Khan in IPL : शाहरुख खानप्रमाणे सलमान खानलाही पाडायचीय आयपीएलमध्ये छाप

तामिळनाडूकडून खेळणाऱ्या अष्टपैलू शाहरुख खानला आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.

Salman Khan in IPL after Shahrukh Khan : आपल्या देशामध्ये क्रिकेट आणि बॉलिवूड चित्रपट या दोन गोष्टींसाठी जनता प्रचंड वेडी आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या काही दशकांपासून शाहरुख खान आणि सलमान खान या जोडगोळीने प्रचंड प्रसिद्धी आणि यश मिळवले आहे. हीच जोडी आता क्रिकेटमध्येही दिसणार आहे, असे म्हटले तर? याच नावाचे दोन युवा क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने या दोघांपैकी एकाची, सलमानची याबाबत मुलाखत घेतली.

तामिळनाडूकडून खेळणाऱ्या अष्टपैलू शाहरुख खानला आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. आयपीएलमुळे तर त्याला घरोघरी ओळख मिळाली. आता शाहरुखनंतर त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेला राजस्थानचा क्रिकेटपटू सलमान खानलाही इंडियन प्रीमियर लीगमध्ये नाव कमवायचे आहे.

२०१६ आणि २०१७ या दोन्ही वर्षी भारताच्या एकोणीस वर्षांखालील आशिया चषकात सलमानचा समावेश होता. २७ वर्षीय शाहरुखप्रमाणेच, सलमानदेखील त्याच्या हार्ड हिटिंग बॅटिंग पद्धतीसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे क्रिकेटपटू सलमान क्रिकेटपटू शाहरुखचा मोठा चाहताही आहे. शाहरुख विषयी बोलताना तो म्हणाला, “शाहरुखची फलंदाजी बघणे म्हणजे एक मेजवानीच आहे. मला त्याच्या फलंदाजीचा आनंद घ्यायला खूप आवडते. त्याला बघून मी माझ्या फलंदाजीवरही मेहनत घेत आहे. जेव्हा मी मैदानात जातो तेव्हा मी सकारात्मक मानसिकतेने जातो. मला माझ्या संघासाठी जास्तीत जास्त सामने जिंकायचे आहेत. जेव्हा मी पन्नास धावा करतो तेव्हा त्याचे शतकात आणि नंतर दीडशेमध्ये कसे रूपांतर होईल याकडे लक्ष देतो. मला थांबायला आवडत नाही.”

हेही वाचा – IPL Media Rights Auction : आयपीएलचे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क दोन स्वतंत्र ब्रॉडकास्टर्सकडे, मिळाले ४४ हजार ७५ कोटी रुपये

या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या सीके नायडू करंडकामध्ये सलमानने पाच सामन्यात ६३.२५ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या होत्या. त्यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचाही समावेश आहे. बिहारविरुद्धच्या सामन्यात त्याने द्विशतकही केले होते.

“मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. मी तरुण आहे आणि मी दररोज काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रशिक्षकांनी आणि वरिष्ठांनी माझी फलंदाजी सुधारण्यात मला खूप मदत केली आहे. मी काही व्यायामासोबत योगासने आणि भरपूर ध्यानधारणा करतो. योगासने आणि ध्यानामुळे माझी फलंदाजी आणखी चांगल्या पातळीवर नेण्यात मला खूप मदत झाली,” असे २३ वर्षीय सलमानने सांगितले.

हेही वाचा – भारतीय संघाला गेल्या सहा महिन्यात मिळाले चार नवीन कर्णधार, फक्त एकालाच मिळाले यश

शाहरुख खानने पंजाब किंग्जकडून आतापर्यंत दोन आयपीएल हंगाम खेळले आहेत. २०२१ आणि २०२२ या दोन्ही वर्षी तो पंजाबच्या संघात होता. १९ सामन्यांत त्याने २७० धावा केल्या आहेत. त्याच्यासारखीच आपल्यालादेखील लवकरच आयपीएलची जर्सी मिळावी, असे सलमानचे स्वप्न आहे.

“मला आयपीएल फ्रँचायझींना प्रभावित करता येईल, अशी आशा आहे. शाहरुख आधीच खेळत आहे आणि तो खरोखर चांगली कामगिरी करत आहे. मलाही त्याच्याप्रमाणे आयपीएल खेळायचे आहे. कारण, तिथे खूप काही शिकायला मिळते. एकाच ठिकाणी जगभरातील क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी मिळते. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना मदत झाली आहे. मीही अशाच संधीची वाट बघत आहे,” असे सलमान म्हणाला.

सलमानने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी रणजी करंडकामध्ये पदार्पण केले. सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये पतियाळा येथे ओडिशाविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात २०३ चेंडूंत १५ चौकारांसह ११० धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णीत राहिला. सलामनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. “माझ्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावताना मला खरोखर आनंद झाला. माझ्या वडिलांनी सर्वांना मिठाई वाटली होती,” असे सलमान म्हणाला.

हेही वाचा – विराट कोहली श्रेष्ठ की बाबर आझम? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले उत्तर

सलमानने वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो जवळच्याच मैदानात काही मोठ्या मुलांना खेळताना बघायचा. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा त्याला आवडली. त्यामुळेच त्यालाही क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. सलमानच्या क्रिकेटवेडाने त्याचे वडील प्रभावित झाले. एके दिवशी त्यांनी त्याला विचारले, “क्रिकेट खेलेगा क्या?” त्या दिवसापासून सलमानला त्याच्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे.

२०१६ मध्ये श्रीलंकेत आणि २०१७ मध्ये मलेशियात झालेल्या आशिया चषकात तो एकोणीस वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता. तेव्हा त्याला तत्कालीन प्रशिक्षक आणि दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविड यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. “राहुल सरांनी मला एक सभ्य क्रिकेटपटू बनण्यास मदत केली आहे. मी त्यांच्याकडून खूप टिप्स घेतल्या. षटकार आणि चौकार मारणे महत्त्वाचे आहेच परंतु स्ट्राइक रोटेटिंग अधिक महत्त्वाचे आहे, हे त्यांनीच मला शिकवले,” असे सलमानने सांगितले.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button