पहिल्या दिवशी ४३ हजार कोटींहून अधिकची बोली ; ‘आयपीएल’ प्रसारण हक्कांसाठी प्रति सामन्यामागे १०० कोटींचा टप्पा पार

पहिल्या दिवशी ४३ हजार कोटींहून अधिकची बोली ; ‘आयपीएल’ प्रसारण हक्कांसाठी प्रति सामन्यामागे १०० कोटींचा टप्पा पार

प्रसारण हक्काच्या बोलीने एकत्रित एकूण आकडा ४३,०५० कोटी रुपयांपर्यंत उंचावला आहे.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पुढील पाच हंगामांसाठी (२०२३ ते २०२७) प्रसारण हक्कांच्या ई-लिलाव प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी रविवारी विविध समूहांनी टीव्ही आणि डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्यासाठी प्रति सामन्यासाठीचा आकडा १०० कोटींपलीकडे गेला. म्हणजेच प्रसारण हक्काच्या बोलीने एकत्रित एकूण आकडा ४३,०५० कोटी रुपयांपर्यंत उंचावला आहे.

२०१७मध्ये झालेल्या गेल्या प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने १६,३४७.५ कोटी रुपयांसह पाच हंगामांसाठीचे (२०१८-२२) प्रसारण हक्क मिळवले होते. यंदा मात्र या रकमेत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. यंदा दोन दिवस चालणाऱ्या ई-लिलाव प्रक्रियेत चार विभागांमध्ये प्रसारण हक्क दिले जाणार असून, हा आकडा ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अ-विभागात भारतीय उपखंडातील टीव्ही (प्रसारण) हक्कांचा समावेश आहे. हे हक्क मिळवण्यासाठी पहिल्या दिवशी ५७ कोटी रुपयांची (प्रति सामना) बोली लावण्यात आली. तसेच ब-विभागात समाविष्ट असलेले भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्याकरिता ४८ कोटी रुपयांची (प्रति सामना) बोली लागली. त्यामुळे प्रति सामन्यामागील एकूण रक्कम ही १०५ कोटी इतकी झाली आहे.

पहिल्या दिवशी जवळपास सात तास चाललेल्या लिलाव प्रक्रियेत व्हायकॉम १८, डिझ्नी-स्टार, सोनी आणि झी या चार समूहांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

चार विभागांमध्ये लिलाव

अ-विभाग : भारतीय उपखंडातील टीव्ही (प्रसारण) हक्क

ब-विभाग : भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क

क-विभाग : डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्येक हंगामात निवडक १८ सामन्यांचे (सलामीचा सामना, अंतिम सामना, बाद फेरीचे सामने समाविष्ट) हक्क

ड-विभाग : परदेशातील टीव्ही आणि डिजिटल हक्क

‘क’, ‘ड’ विभागासाठी ५५०० कोटींची बोली? रविवारी अ आणि ब विभागांतील प्रसारण हक्कांसाठी लिलाव झाला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क आणि ड विभागासाठी लिलाव सुरू होईल. या दोन विभागांतही मोठय़ा बोलींची ‘बीसीसीआय’ला अपेक्षा आहे. ‘‘क आणि ड विभागांसाठी साधारण ५५०० कोटी रूपयांची बोली लागू शकेल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status