IND vs SA 2nd T20 : क्लासेनच्या क्लाससमोर भारतीय संघ फेल, आफ्रिकेविरुद्ध भारताचा सलग दुसरा पराभव

IND vs SA 2nd T20 : क्लासेनच्या क्लाससमोर भारतीय संघ फेल, आफ्रिकेविरुद्ध भारताचा सलग दुसरा पराभव
IND vs SA 2nd T20 Result : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी ट्वेंटी क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी ट्वेंटी सामना आज (१२ जून) रोजी ओडिशास्थित कटकमधील बाराबती स्टेडियमवर झाला. चार गडी राखून दक्षिण आफ्रिकेच्या संघाना हा सामना आपल्या खिशात घातला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघान २-० अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी, ९ जून रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेला पहिला सामनादेखील आफ्रिकेने जिंकला होता.
१४९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सुरुवातीलाच पाहुण्यांनी एकापाठोपाठ तीन धक्के दिले. पहिल्याच षटकात रिझा हेंड्रिक्स बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकात ड्वेन प्रिटोरियस बाद झाला. मागील सामन्यातील आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या रॉसी व्हॅन डेर डुसेनला कुमारने सहाव्या षटकात बाद केले. कर्णधार टेम्बा बावुमाने मात्र, एक बाजू लावून धरली होती. तो १३व्या षटकात बाद झाला. त्याने ३० चेंडूंमध्ये ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर हेन्रिक क्लासेनने ४६ चेंडूत ८१ धावांची शानदार खेळी केली. भारताच्यावतीने भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी करत चार षटकांमध्ये अवघ्या १३ धावा देऊन चार बळी घेतले. तर, युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
2ND T20I. South Africa Won by 4 Wicket(s) https://t.co/fLWTMjh0UQ #INDvSA @Paytm— BCCI (@BCCI) June 12, 2022
त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून यजमान भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत सहा गडी गमावून १४८ धावा केल्या. सलामीसाठी आलेली ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडची जोडी या सामन्यात फारशी कमाल करू शकली नाही. ऋतुरात अवघी एक धाव करून बाद झाला. त्यानंतर ईशान किशन (३४) आणि श्रेयस अय्यरने (४०) डाव सावरण्या प्रयत्न केला. मात्र, ठराविक अंतराने आफ्रिकन गोलंदाजांनी बळी घेण्याचा सपाटा सुरू ठेवल्याने भारतीय फलंदाजी ढेपाळली.
हेही वाचा – ‘प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत आयपीएल नविन उंची गाठेल’, जय शाह यांनी व्यक्त केला विश्वास
कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या विशेष कमाल दाखवू शकले नाही. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात दोन षटकार मारत संघाची धावसंख्या १४० च्या पुढे नेली. कार्तिक २१ चेंडूत ३० धावा करून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेच्यावतीने एनरिक नॉर्कियाने २ तर कागिसो रबाडा, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
आज झालेल्या पराभवामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-०ने पिछाडीवर पडला आहे. मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी १४ जून रोजी विशाखापट्टणम येथे होणारा तिसरा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ असणार आहे.