ऍस्ट्रोलॉजी

पंचाग कसे वाचावे ?

पंचाग कसे वाचावे ?

पंचांगाचे मुख्य दोन प्रकार सायन आणि निरयन. पंचांगाची पाच अंगे आहेत – तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या 5 अंगाची माहिती असणार्‍याला पंचांग म्हणतात.
तिथी – तिथी म्हणजे शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत व कृष्णपक्षात प्रतिपदेपासून …

पंचांगाचे मुख्य दोन प्रकार सायन आणि निरयन. पंचांगाची पाच अंगे आहेत – तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या 5 अंगाची माहिती असणार्‍याला पंचांग म्हणतात. 

तिथी
तिथी म्हणजे शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत व कृष्णपक्षात प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत रोज एक जो दिवस असतो त्याला तिथी म्हणतात. 

 

हिंदु महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षापासून होते तर काही राज्यात कृष्ण पक्षापासून होते. 

 

शुक्ल पक्षातल्या पहिल्या तिथीला प्रतिपदा, दुसऱ्या तिथीला द्वितीया, तिसऱ्या तिथीला तृतिया, चौथ्या तिथीला चतुर्थी, पाचव्या तिथीला पंचमी, सहाव्या तिथीला षष्ठी, सातव्या तिथीला सप्तमी, आठव्या तिथीला अष्टमी, नवव्या तिथीला नवमी, दहाव्या तिथी दशमी, अकराव्या तिथीला एकादशी, बाराव्या तिथी द्वादशी, तेराव्या तिथीला त्रयोदशी, चौदाव्या तिथीला चतुर्दशी तर व शेवटच्या तिथीला पौर्णिमा म्हणतात. तसेच कृष्ण पक्षाची सुरुवात प्रतिपदेने होते आणि या पक्षाच्या शेवटची तिथी अमावस्या असते. 

 

तिथी म्हणजे सुर्य व चंद्र यांच्या मध्ये 12 अंशाचे अंतर पुर्ण झाल्यावर एका तिथीची समाप्ती होते. अमावस्येला सुर्य व चंद्र एकाच राशीत व एकाच अंशात असतात. त्यानंतर चंद्र सुर्याच्या पुढे निघून जातो. ज्यावेळेस सुर्य व चंद्रामध्ये बरोबर 12 अंशाचे अंतर पुर्ण होते त्यावेळेस एक तिथी समाप्त होते. पहिल्या तिथीच्या समाप्तीच्या वेळेस सुर्य एक अंश तर चंद्र जवळपास 13 अंश असतो. त्यानंतर सुर्य परत एक अंश पुढे जातो व चंद्र सुद्धा पुढे जातो परत ज्यावेळेस त्यांच्यामध्ये 12 अंश अंतर निर्माण होते त्यावेळेस दुसरी तिथी समाप्त होते. अशा एकूण शुक्ल पक्षात 15 तिथी असतात व कृष्ण पक्षात 15 तिथी असतात. ज्याला आपण पंधरवडा म्हणतो. पंचांगात तिथीची समाप्ती वेळ दिलेली असते.

 

तिथी क्षय

जी तिथी कोणत्याही सुर्योदयाच्या वेळेस नसते त्या तिथीला क्षय तिथी म्हणतात. पंचांगात क्षय तिथी सुर्योदयाला असलेल्या तिथीच्या खालीच दिलेली असते तसेच वृध्दी तिथी पहिल्या दिवशी अहोरात्र म्हणून व दुसऱ्या दिवशी तिची समाप्ती देऊन दिलेली असते.

 

तिथींचे प्रकार

ज्योति़शास्त्रानुसार तिथींचे सहा प्रकार आहेत – 

नंदा तिथी : प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी

भद्रा तिथी : द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी.

जया तिथी : तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी

रिक्ता तिथी : चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी

पूर्णा तिथी : पंचमी, दशमी, पौर्णिमा आणि अमावास्या

शून्या तिथी (एकूण १९): चैत्र कृष्ण अष्टमी, वैशाख कृष्ण नवमी, ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी, आषाढ कृष्ण षष्ठी, श्रावण कृष्ण द्वितीया और तृतीया, भाद्रपद कृष्ण प्रतिपदा व द्वितीया, आश्विन कृष्ण दशमी व एकादशी, कार्तिक कृष्ण पंचमी व शुक्ल चतुर्दशी, मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी व अष्टमी, पौष कृष्ण चतुर्थी व पंचमी, माघ कृष्ण पंचमी व माघ शुक्ल तृतीया या तिथींना शून्या तिथी समजले जाते.

 

वार

होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे म्हणजे दिवसाचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास याने हा भाग घेतला जातो. प्रत्येक होऱ्याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.

 

एका सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे. धार्मिक सोयींसाठी हिंदू पंचांगात सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ होतो असे समजले जाते. 

 

प्रत्येक ग्रहाचा एक होरा असतो. शनिवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चौथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा झाल्यावर २१ होरे होतात. त्यानंतर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो, असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस रवीच्या होऱ्याने सुरू होतो, त्यामुळे शनिवारनंतर रविवार येतो. पुन्हा २४ होरे मोजले की तिसऱ्या दिवसाचा पहिला होरा चंद्राचा म्हणजे सोमाचा म्हणून रविवारनंतर सोमवार येतो.

 

वारांची नावे

रविवार

सोमवार

मंगळवार

बुधवार

गुरुवार

शुक्रवार

शनिवार

 

नक्षत्र 

नक्षत्र 27 असतात. चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्मनक्षत्र असते. पंचांगात नक्षत्राची समाप्ती वेळ दिलेली असते. एका राशीत सव्वादोन नक्षत्र असतात. एका राशीमधे एकूण नऊ भाग असतात. नक्षत्रात एकूण चार भाग आणि त्या भागाना चरण म्हणतात. प्रत्येक चरणाला एक नाव असते ज्याला जन्माक्षर म्हणतात. नक्षत्राच्या को़णत्या भागात अर्थात कोणत्या चरणात जन्म झाला यावरुन जन्म चरणांक आणि जन्मनाव असते.

 

मेष : अश्विनी पुर्ण, भरणी पुर्ण, कृत्तिका पहिले चरण

वृषभ : कृत्तिका शेवटचे तीन चरण, रोहिणी पुर्ण , मृगशीर्ष पहिले दोन चरण 

मिथुन : मृगशीर्ष शेवटचे दोन चरण, आद्रा पुर्ण, पुनर्वसु पहिले तीन चरण 

कर्क : पुनर्वसु चौथा चरण, पुष्य पुर्ण, आश्लेषा पुर्ण 

सिंह : मघा पुर्ण, पूर्वा फाल्गुनी पुर्ण, उत्तरा फाल्गुनी पहिले चरण 

कन्या : उत्तरा फाल्गुनी शेवटचे तीन चरण, हस्त पुर्ण , चित्रा पहिले दोन चरण 

तुला : चित्रा शेवटचे दोन चरण, स्वाती पुर्ण, विशाखा पहिले तीन चरण 

वृश्चिक : विशाखा चौथा चरण, अनुराधा पुर्ण, ज्येष्ठा पुर्ण 

धनु : मूळ पुर्ण, पूर्वाषाढा पुर्ण, उत्तराषाढा पहिले चरण 

मकर : उत्तराषाढा चौथा चरण, श्रवण पुर्ण, धनिष्ठा पहिले दोन चरण 

कुंभ : धनिष्ठा शेवटचे दोन चरण, शततारका पुर्ण, पूर्वा भाद्रपदा पहिले तीन चरण 

मीन : पूर्वा भाद्रपदा चौथा चरण, उत्तरा भाद्रपदा पुर्ण, रेवती पुर्ण नक्षत्र

 

अभिजित नावाचे फक्त १९ घटी असलेले २८वे नक्षत्र, उत्तराषाढाच्या शेवटच्या १५ घटी आणि श्रवण नक्षत्राच्या सुरुवातीच्या ४ घटी मिळून बनते असे मानले गेले आहे. अभिजितचे चारही चरण मकर राशीत असल्याचे सांगितले जाते. एक घटी म्हणजे नक्षत्राचा साठावा भाग.

 

योग

चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात. असे एकूण २७ योग आहेत. चंद्र व सुर्य यांच्या भोगांची बेरीज जर 800 कला पुर्ण झाली की, एक योग पुर्ण होतो.

 

योगांची नावे

१. विष्कम्भ २. प्रीति ३. आयुष्मान ४. सौभाग्य

५. शोभन ६. अतिगंड ७. सुकर्मा ८. धृति

९. शूल १०. गंड ११. वृद्धि १२. ध्रुव

१३. व्याघात १४. हर्षण १५. वज्र १६. सिद्धि

१७.व्यतिपात १८. वरीयन १९. परीघ २०. शिव

२१. सिद्ध २२. साध्य २३. शुभ २४. शुक्ल

२५. ब्रह्म २६. एन्द्र २७. वैधृति

 

नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो. वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात. या योगावर जन्म झाल्यास शांती करावी लागते. गणिताने येणारे हे योग व अमृतसिध्दियोग हे दोन्ही वेगवेगळे आहेत. अमृतसिध्दियोग हे वार व नक्षत्र मिळून तयार होतात. 

 

करण

करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग. पहिले करण पहिल्या अर्ध्या भागात असते तर दुसरे करण हे तिथीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात असते असे एकूण अकरा करण आहेत त्यापैकी चार करण हे स्थिर असतात व सात करण हे चर असतात म्हणजे ते परत परत येतात. 

सात करणे आहेत – बल, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज, विष्टी. शकुनी, चतुष्पाद, नाग, किंस्तुघ्न हे चार करण स्थिर असतात. विष्टी हे या ११ करणांपैकी ७वे करण. याचेच नाव भद्रा. हे करण सदैव गतिशील असते. विष्टी करण असलेला भद्रा काल अशुभ समजला जातो. पंचांगात याचा प्रारंभकाल आणि समाप्तिकाल देण्याचा परिपाठ आहे. त्यांना अनुक्रमे भद्रा प्रवृत्ती आणि भद्रा निवृत्ती असे म्हणतात. पंचांगात हा काल भ.प्र. आणि भ.नि. अशा संक्षिप्त रूपात दर्शवतात. 

 

करिदिन

ज्या दिवशी पंचांगात करिदिन असे लिहिलेले असते तो दिवस. करिदिन हे सात असतात. 

1. भावुका अमावस्येचा दुसरा दिवस 

2. दक्षिणायनारंभ दुसरा दिवस 

3. उत्तरायणारंभ दुसरा दिवस 

4. चंद्र व सूर्य ग्रहण दुसरा दिवस 

5. कर्क संक्रांति दुसरा दिवस 

6. मकर संक्रांति दुसरा दिवस 

7. होळी दुसरा दिवस 

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status