४०० मीटर शर्यतीत पुनरागमनाचे धावपटू हिमा दासचे संकेत!

४०० मीटर शर्यतीत पुनरागमनाचे धावपटू हिमा दासचे संकेत!
चेन्नई : भारताची आघाडीची धावपटू हिमा दासने पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
२०१८च्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावत हिमा प्रकाशझोतात आली होती. त्याच वर्षी तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीत वैयक्तिक रौप्य, तर ४ ७४०० मीटर रिलेच्या महिला आणि मिश्र गटात सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, या स्पर्धेदरम्यान तिला दुखापत झाली आणि तिच्या कामगिरीचा आलेख खालावला. हिमाला एप्रिल २०१९मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील ४०० मीटर शर्यत पाठीच्या दुखापतीमुळे अर्ध्यातच सोडावी लागली. त्यानंतर तिने मोठय़ा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला नाही.
‘‘४०० मीटर शर्यतीत सहभागी होणे मी पूर्णपणे थांबवलेले नाही. मला दरम्यानच्या काळात दुखापत झाली आणि त्यातून सावरण्यासाठी वेळ लागला. जायबंदी असताना मला ४०० मीटर शर्यतीत धावणे शक्य नव्हते. त्यामुळे पाठीवर ताण पडत होता. मात्र, मी उपचार घेतले आणि मग टप्प्याटप्प्याने विविध शर्यतींमध्ये भाग घेतला. काही दिवसांपूर्वी मी युरोपातील ३०० मीटरची शर्यतही पूर्ण केली. मी अजून ४०० मीटरच्या शर्यतीत भाग घेऊ शकत नसले, तरी भविष्यात पुनरागमनाचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. आशियाई क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडल्याने मला तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने मी वर्षअखेरीस ४०० मीटर शर्यतीचा सराव सुरू करू शकेन,’’ असे हिमा म्हणाली.