‘प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत आयपीएल नविन उंची गाठेल’, जय शाह यांनी व्यक्त केला विश्वास

‘प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत आयपीएल नविन उंची गाठेल’, जय शाह यांनी व्यक्त केला विश्वास

आयपीएल स्पर्धेचा कालावधी आणखी वाढू शकतो. अशा स्थितीमध्ये २०२३ ते २७ या काळातील माध्यम हक्काचे करार नवीन विक्रम स्थापित करतील अशी अपेक्षा आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) आजचा दिवस (१२ जून) ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आयपीएलच्या माध्यम हक्कांची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. अगोदर पॅकेज ए आणि पॅकेज बीसाठी ई-लिलाव सुरू झाला. या लिलाव प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत आयपीएल दुसऱ्या स्थानावर जाईल, अशी बीसीसीआयला अपेक्षा आहे. सध्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा (एएफएल), इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) आणि मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) या स्पर्धानंतर आयपीएलचा चौथा क्रमांक लागतो.

दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने या हाय-प्रोफाइल शर्यतीतून काल (११ जून) उशीरा माघार घेतली. त्यामुळे आता डिस्ने स्टार, सोनी, झी, व्हायाकॉम-रिलायन्स या प्रक्षेपकांवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. ‘आजच्या लिलावामध्ये निश्चित केलेली मूळ किंमत जरी बीसीसीआयला मिळाली तरी आयपीएलच्या मूल्यांकनात ही मोठी झेप ठरेल’, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.

“सध्या, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील एका सामन्यासाठी प्रक्षेपकाला सुमारे १७ दशलक्ष डॉलर मोजावे लागतात. कोणत्याही क्रीडा स्पर्धेतील एका सामन्यासाठी मिळणारा हा सर्वोच्च खर्च आहे. त्यापाठोपाठ इंग्लिश प्रीमियर लीगमधील एका सामन्यासाठी ११ दशलक्ष डॉलर्स आणि मेजर लीग बेसबॉल स्पर्धेतील सामन्यासाठीदेखील अंदाजे इतकाच खर्च होतो. गेल्या पाच वर्षांच्या काळात एका आयपीएल सामन्यातून आम्हाला नऊ दशलक्ष डॉलर्स मिळाले. यावेळी, आम्ही निश्चित केलेल्या सध्याच्या किमान आधारभूत किमतीनुसार, बीसीसीआयला प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी १२ दशलक्ष डॉलर मिळतील. जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटने घेतलेली आतापर्यंची सर्वात मोठी झेप ठरेल. म्हणजेच एनएफएलनंतर आयपीएलचा क्रमांक लागेल,” जागतिक क्रीडा स्पर्धांचा बीसीसीआयने केलेल्या अभ्यासाचा हवाला देत जय शाह यांनी इंडियन एक्स्प्रेसला अशी माहिती दिली.

हेही वाचा – India vs South Africa 2nd T20 : आजचा सामना जिंकून भारत दक्षिण आफ्रिकेची बरोबरी करणार का? जाणून घ्या संभाव्य संघ आणि खेळपट्टीची स्थिती

बीसीसीआयसाठी, त्यांच्या पाच वर्षांच्या कालखंडातील हे सलग दुसरे प्रसारण विंडफॉल असेल. २०१७ मध्ये, आयपीएल प्रसारणाचे एकूण हक्क स्टार इंडियाने मिळवले होते. त्यासाठी त्यांनी सुमारे तीन बिलियन डॉलर्स इतकी रक्कम मोजली होती. ही रक्कम त्यावेळीदेखील क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कम ठरली होती. आयपीएलमध्ये आता १० संघांचा समावेश झाला आहे. त्यामुळे स्पर्धेचा कालावधी आणखी वाढू शकतो. अशा स्थितीमध्ये २०२३ ते २७ या काळातील माध्यम हक्काचे करार नवीन विक्रम स्थापित करतील अशी अपेक्षा आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेली दोन नवीन संघांची विक्री ही आयपीएलच्या वाढीची पूर्वसूचना होती. लखनऊ फ्रँचायझीला मूळ किंमतीपेक्षा २५० टक्के अधिक रक्कम मिळाल्याने बीसीसीआयला एकूण १.७ अब्ज डॉलर्सची कमाई झाली होती.

शाह यांच्या म्हणण्यानुसार, ‘बीसीसीआयने चांगली किंमती मिळावी यासाठी ई-लिलावाचा पर्याय निवडला आहे. अशा स्थितीमध्ये बोली लावण्यास इच्छुक असलेल्या कंपन्या ऑनलाईन पद्धतीने लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील. प्रत्येक बोली त्यांच्या स्क्रीनवर तत्काळ प्रदर्शित केली जाईल. विजेते ठरल्यानंतरच बोली लावणाऱ्याचे नाव उघड होईल. यामुळे लिलाव प्रक्रिया पारदर्शक राहिल.’

यावेळी प्रसारमाध्यमांचे हक्क चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. पॅकेज एमध्ये भारतीय उपखंडातील दूरदर्शन प्रसारणाचे हक्क आहेत. पॅकेज बीमध्ये डिजिटल माध्यमांसाठीचे हक्क आहेत. पॅकेज सीमध्ये महत्त्वाच्या सामन्यांचा प्रसारण हक्कांचा समावेश आहे तर पॅकेज डीमध्ये परदेशातील प्रसारणाचे हक्क आहेत.

हेही वाचा – VIDEO : ‘माझे खरे ध्येय तर…’, आयपीएल विजेत्या कर्णधाराने सांगितली भविष्यातील योजना

नव्याने मांडलेल्या पॅकेज सीमध्ये, आठवड्याच्या शेवटी येणारे सामने, उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पॅकेज ए आणि बीला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. शाह म्हणाले की, ‘आयपीएलला अधिक प्रसारण भागीदार मिळावेत म्हणून हे नवीन पॅकेज सादर करण्यात आले आहे.’

“जर आम्ही पारंपारिकपणे लिलाव प्रक्रिया केली असती तर आम्हाला मर्यादित संख्येनेच खरेदीदार मिळाले असते. अनेक कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही पॅकेज सी सुरू केले. यामुळे क्रिकेटचा विकास होण्यास मदत होईल. जर अधिक कंपन्या लिलावाच्या रिंगणात असतील तर ते खेळाच्या भविष्यातील प्रगतीच्यादृष्टीने चांगले ठरेल,” असे शाह म्हणाले. एनएफएलचे उदाहरण देऊन शाह म्हणाले, “त्यांच्याकडे सात प्रसारण कंपन्या आहेत, आम्ही तर फक्त तीन किंवा चारची अपेक्षा ठेवली आहे.”

रिलायन्सचे वुट, हॉटस्टारचे डिस्ने या ओटीटी प्लॅटफॉर्मसह झी आणि सोनीचे ओटीटी प्लॅटफॉर्म्स अगोदर आपापसात भिडलेले आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलच्या डिजिटल हक्कांसाठी दूरदर्शनच्या हक्कांपेक्षाही जास्त किंमत मिळू शकते. शाह यांना याची पूर्ण कल्पना आहे. “२०२४ पर्यंत भारतात ९०० दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते असतील. त्यामुळेच क्रिकेटच्या वाढीसाठी डिजिटल हक्क खूप महत्त्वाचे बनले आहेत,” असे शाह म्हणाले.

आयपीएल ही वर्षभर चालणारी स्पर्धा नसल्यामुळे तिचे एकूण प्रसारण करार मूल्य इतर प्रमुख क्रीडा स्पर्धांपेक्षा खूपच कमी आहे. एनएफएलसाठी ४३ अब्ज डॉलर्स मिळतात तर एनबीएसाठी २३ अब्ज डॉलर्स मिळतात. “आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फ्युचर टूर्स प्रोग्रामसाठी वचनबद्ध आहोत. भारतीय क्रिकेट संघ ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. अशा दौऱ्यांतून इतर क्रिकेट खेळणारे देश कमाई करतात. त्यामुळे आमच्यावर जगभर क्रिकेट वाढवण्याचीही जबाबदारी”, असे शाह म्हणाले.

एकूणच शाह यांच्या अंदाजानुसार, आयपीएल ही स्पर्धा प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत दुसऱ्या स्थानावर जाईल.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button