बातम्या

बँकॉकहून ६० किलो सोनं तस्करी करुन मुंबई विमानतळाच्या बाहेर आणलं, मात्र रिक्षा चालकाकडून घात

बँकॉकहून ६० किलो सोनं तस्करी करुन मुंबई विमानतळाच्या बाहेर आणलं, मात्र रिक्षा चालकाकडून घात

हेराफेरीचे मती गुंग करणारे प्रकरण घाटकोपर पोलीसांनी उघडकीस आणले आहे. साठ किलोच्या सोन्यासाठी कोणी डोकं लढवत केली तस्करी आणि कोणी केली भुरटी चोरी ? वाचा नेमकं काय घडलं

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर हमखास तगडं भाडं मिळतं, म्हणून तो रोज तेथे आपली लाडकी रिक्षा लावून मोठं भाडं मिळण्याची वाट पहात उभा रहायचा पण त्या दिवशी त्याने चांगलंच मोठं भाडं मारलं. चोरावर मोर…शेरास सव्वाशेर.. चोर की दाढी में तिनका अशा मराठी, हिंदी म्हणी तुम्ही ऐकल्या असतील. या सारख्या सर्व म्हणी सत्यात उतरविणारी ही अजब कहाणी आहे. आपला प्रवासी चांगलाच घाबरा घुबरा झालेला आहे ते त्या रिक्षावाल्याने पाहिलं आणि त्याच्या डोक्याचं चक्र फिरू लागलं आणि व्हाईट कॉलर तस्कराचं तगडं भाडं एका सामान्य बिहारी ऑटोवाल्याने कसं मारलं ते वाचाच..
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाडे घेण्यासाठी उभ्या असलेल्या एका रिक्षावाल्याकडे गेल्यावर्षी २२ सप्टेंबरला एक लांबचं भाडं आलं.
रिक्षाचा दट्ट्या ओढत त्याने गाडी स्टार्ट करीत, साहब कहा जाना है अशी विचारणा केली. आपला प्रवासी जरा जास्त घाबराघुबरा झालेला पाहून त्याला संशय आला. त्यामुळे त्याने गप्पा सुरू केल्या. या प्रवाशाला नेमका एक कॉल आला आणि हा प्रवासी आपल्यासाठी काही तरी घबाड घेऊन आला असल्याचे रिक्षा चालकाला समजले.
रिक्षा चालकाच्या डोक्यात विचाराचे चक्र सुरू झाले, बॅगेत काही तरी घबाड आहे, पण नेमके ते काय असावे. त्त्यामुळे त्याने मदतीला आपल्या अन्य मित्राला मोबाईलवरून फोन करून  बोलावले. त्यानंतर त्याने बहाणा बनवत रिक्षात काही गडबड झाल्याचे सांगत रिक्षा एका सुनसान जागी थांबविली…आणि कंटाळलेला प्रवासी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर उभा असल्याचे पाहून त्या बॅगेसह रिक्षा धुममचाके पळविली. आणि प्रवासी हताश होऊन पहातच राहिला.
पोलीसही हैराण झाले..
राजेश प्रेमजी वरीया यांनी घाटकोपर पोलीसांत तक्रार केली की एक रिक्षावाला विमानतळावरून येताना आपले सोने घेऊन पळाला. हे ऐकून पोलीसही उडाले. साठ किलोचं सोनं पळवून रिक्षासह चालक फरार हे जरा आक्रितच होतं. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे आणि गुन्हे प्रकटीकरण पथक या गुन्ह्याचा तपास करण्याच्या कामाला लागले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. साठ किलोचं सोनं घेऊन पसार झालेल्या या आरोपीचे नंदकिशोर यादव असल्याचे त्यांना समजले.
बिहारमधून मुसक्या आवळल्या
आरोपी नंदकिशोर यादव (22 वर्षे) आणि त्याचा साथीदार सरवणकुमार नकुल साह ही दुकली हे सोने घेऊन बिहारला पसार झाल्याचे त्यांना समजले. हे दोघे बिहारच्या जमुई जिल्ह्यातले असल्याचं तपासात समोर आले. बिहारमधील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून तो ओळखला जातो. त्यामुळे अखेर घाटकोपर पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या शोधासाठी बिहार राज्यात पोहोचले आणि सोनोमधल्या स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने दोन्ही आरोपींना पकडले.
कहाणी मैं नया ट्वीस्ट
आरोपींनी बिहारमध्ये पळविलेल्या 30 लाख रुपये किंमतीच्या सोन्यापैकी काही सोने विकूनही ते मोकळे झाले. 24 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलं आहे. ज्यामध्ये 9 लाखांची रोख रक्कमही आहे. परंतू नंतर कहाणी नया ट्वीस्ट आला. रिक्षावाल्यांनी लुबाडलेले सोने हे बँकॉकमधून तस्करी मार्गे मुंबईत आणल्याचे तपासात उघड झाले. कस्टम आणि डीआरआयच्या डोळ्यात धूळफेक करून लपवून भारतात आणलेले हे सोन एका एका सामान्य अशिक्षित रिक्षावाल्याने पळविल्याचं उघड झालं. फिर्यादी राजेश वरीया हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status