माहिती विभाग

सीपीआरला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा गतीने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दीपक केसरकर

सीपीआरला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा गतीने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : श्रीअंबाबाई मंदिर, श्रीजोतिबा मंदिर, पंचगंगा नदी घाट परिसर विकास तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयासह (सीपीआर) अन्य रुग्णालयांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा गतीने देवून कोल्हापूरला प्राचीन काळापासून असणारे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे मॉड्युलर ओटी व बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील कुरुंदवाडे, श्रीमती थोरात, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, येत्या काळात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सुसज्ज व्हावे, यासाठी 38 कोटी रुपयांचा नवीन आराखडा तयार केला असून लवकरात लवकर त्याला मंजुरी देण्यात येईल. कोल्हापूरमध्ये उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यांनादेखील फायदा झाला आहे. येत्या काळात सीपीआरच्या गरजा पूर्ण करुन सर्व जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या मॉडयुलर ओ.टी. व बालरोग अतिदक्षता विभागाचा लाभ कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना होईल. नजिकच्या काळात या रुग्णालयामध्ये सांधेरोपण, अवयव प्रत्यारोपण, कानाचे कॉक्लींअर इंप्लॉट सारख्या महत्वाच्या शस्त्रक्रियाही पार पडतील, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोरोनासारख्या कठीण काळात या रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफने केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, कोविड काळात रुग्णालयाची गरज ओळखून या ठिकाणी कोविड आयसीयू युनिट तयार केले. थोरला दवाखाना म्हणून हजारो लोक उपचार घेण्यासाठी इथं आपलेपणाने येतात. या रुग्णालयाच्या गरजा पाहून येत्या काळामध्ये हे रुग्णालय राज्यातील अग्रेसर रुग्णालय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुया.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर मध्ये बदलत्या काळानुसार अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिली असून याचा सर्वसामान्यांना नक्की लाभ होईल. वैद्यकीय क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना तात्काळ मंजुर केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री श्री. केसरकर यांना धन्यवाद दिले. शेंडा पार्क मधील हॉस्पिटल लवकरच कार्यान्वित होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वागत अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसंतराव देशमुख यांनी केले. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयास सन २०२१ -२२ साली कोविडच्या तिस-या लाटेत लहान बालकांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीच्या कोविड निधिमधून बालरोग अतिदक्षता विभागाच्या श्रेणीवर्धनाकरीता ७५ लाख रुपये बांधकाम खर्च व १३४ लाख रुपये यंत्रसामुग्री, साधनसामुग्री खरेदी करण्याकरीता निधी प्राप्त झाला. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण निधीमधुन दोन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या कामास मंजुरी मिळाली. यामधुन कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या मॉडयुलर ओ.टी. करीता १९३ लाख रुपये व ट्रामा केअर युनीटच्या मॉड्युलर ओ.टी. करीता २२२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.
आभार अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत यांनी मानले. डॉ. प्रिया होंबाळकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीष कांबळे, कान- नाक- घसा शास्त्र विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. राहुल, बालरोग चिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुधीर सरवदे, प्रभारी अधिसेविका अंजली देवरकर तसेच इतर अध्यापक, महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
000

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status