मंत्रिमंडळातून लालूंचा पत्ता कापण्याची शक्यता

मंत्रिमंडळातून लालूंचा पत्ता कापण्याची शक्यता

नव्या सरकारमधून विद्यमान रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता असून मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षालाही दूर ठेवण्यात येणार असल्याचे समजते. नव्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी केलेल्या पक्षांनाच प्राधान्य देण्याचे कॉंग्रेसने ठरविले असल्याचे संकेत आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीची आज बैठक झाली. तीत निवडणूक निकालावर चर्चा करण्यात आली. पण त्यात लालू किंवा मुलायम यांचा उल्लेख झाला नाही. अर्थात मंत्रिमंडळ बनविण्यासंदर्भात मंगळवारी निवडणूकपूर्व युतीत सहभागी असलेल्या द्रमुक, तृणमुल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. लालू, मुलायम व पासवान यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेत चौथी आघाडी स्थापन केली आणि प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र तोंडावर आपटले. त्यामुळे त्यांच्याविषयीचा निर्णय युपीएत राहूनच निवडणूक लढविलेल्या पक्षांशी चर्चा करून घेण्यात येणार आहे. युपीएला नव्या लोकसभेत २६१ जागा मिळाल्या असून बहूमतासाठी त्यांना अवघ्या ११ जागांची गरज आहे. पण समाजवादी पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष देवेगौडा यांनी कॉंग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे. पण त्रासदायक ठरणार्‍या समाजवादी पक्षाला सत्तेपासून दूरच ठेवावे असे पक्षात मत आहे. पण यासंदर्भात बैठकीत काहीही चर्चा झाली नाही, असे पक्षाचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मंत्रिमंडळातच रहाण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. पण अर्थात, यासंदर्भातील निर्णय कॉंग्रेस घेणार आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status