नाशिकचे काळाराम मंदिर

नाशिकचे काळाराम मंदिर
दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक. प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे. WD संपूर्ण मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूती समोरच्या मंदिरातील श्रीरामाच्या चरणी पाहतो, असा भाव आहे. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे. मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत. तिसर्या दालनात मंदिराचा गाभारा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहे. मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्या आहेत. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते. WD बघण्यासारखे इतर काही याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीतागुंफा आहेत. येथेच सीतेने साधना केल्याचे बोलले जाते. पंचवटी हे नाव ज्यामुळे पडले ते पाच प्रसिद्ध वटवृक्षही याच परिसरात आहेत. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी वाहते. प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर मंदिरेही याच परिसरात आहेत. कसे जाल? रस्ता- नाशिक मुंबईहून १६० किलोमीटर व पु्ण्याहून २१० किलोमीटरवर आहे. मुंबई-आग्रा महामार्ग नाशिकमधूनच जातो. रेल्वे- नाशिक मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणार्या जवळपास सर्व गाड्या नाशिकमधूनच जातात. हवाई मार्ग- नाशिकला आता हवाई वाहतूकही होते. किंगफिशरद्वारे मुंबई ते नाशिक हवाई वाहतूक केली जाते.